राज ठाकरे जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार, महाराजांची भूमिका कोण साकारणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जागतिक स्तरावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केलेली. याबाबत राज ठाकरे यांना अमोल कोल्हे यांनी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न विचारला.
“हा प्रश्न अत्यंत स्वार्थाची किनार असलेला प्रश्न आहे. कारण आपण एक शिवभक्त आहात हे माहिती आहे. समोर एक कॉम्पिटिशन बसलेली आहे. तरीसुद्धा हा प्रश्न आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट यावा अशी आपलीसुद्धा इच्छा आहे. याबद्दल तुम्ही मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं. तो चित्रपट आपण दिग्दर्शित करावं, अशीही इच्छा आहे. त्याचं काम कधी सुरु होणार? कारण वय होत चाललंय. त्यामुळे हा स्वार्थी प्रश्न असू शकतो”, असं अमोल कोल्हे मिश्किलपणे म्हणाले.
“चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. लिखाणाचं काम सुरु झालं. हा चित्रपट तीन भागात येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट असेल. आंतरराष्ट्रीय दर्जावरचेच लोकं या चित्रपटात काम करतील”, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, “म्हणजे यामध्येही बिटविन द लाईन आहे. एकतर ते मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे असं म्हणत आहेत आणि…”. अमोल कोल्हे यांचं वक्तव्य पूर्ण होण्याचं बाकी असतानाच राज ठाकरे म्हणाले, “नाही पण मी पण नाहीय. मी पण दिग्दर्शित करत नाहीय”.

Comments
Post a Comment